विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी असे मानले जाते. राजाच्या विरूद्ध बंड करणाऱ्यांचा पाडाव करून राजाची मर्जी राखणारे ते बंडहारी – भंडारी असाही एक समज आहे. ते ताडीमाडी काढण्याच्या व्यवसायाकडे अठराव्या शतकात वळल्याचे दिसते; तसेच, ते दारू गाळण्याचा व्यवसायही करत असत. भंडारी समाज मूळचा क्षत्रिय. तो राजनिष्ठ व लढवय्या होता. सखाराम हरी गोलतकर यांनी 1925 मध्ये ‘भंडारी ज्ञातीचा इतिहास’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांची वस्ती कारवार होनावर्ते ते गुजराथच्या किनारपट्टीपर्यंत आहे.
भंडारी जातीची उत्पत्ती पं. महादेवशास्त्री जोशी यांनी पुराण कथेने नोंदली आहे - तिलकासूर नावाचा दैत्य फार माजला होता. म्हणून भगवान शंकराने त्याला घाण्यात टाकले आणि नंदीला घाणा फिरवण्यासाठी सांगितले. नंदीचे कष्ट पाहून शंकराला घाम आला. त्याच्या कपाळावरील घर्मबिंदूतून एक पुरुष निर्माण झाला. तो भंडाऱ्यांचा मूळ पुरुष! तो शंकराची स्तुती करत होता म्हणून शंकराने त्याला भावगुण असे नाव ठेवले. शंकराने त्याच्या लिलेने तेथे एक नारळाचे झाड निर्माण केले आणि त्यावरचे फळ तोडून आणण्याची आज्ञा भावगुणाला केली. ते पाणी पिऊन शंकर तृप्त झाला आणि त्याने भावगुणाला अलकावतीच्या भांडारावर अधिकारी म्हणून नेमले.